
नांदेडमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोहिमेत सहभाग
नांदेड – शहर वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक २९ मार्च रोजी महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. चौक, वजिराबाद चौक या ठिकाणी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक आणि पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे यांनी केले.
ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे आणि ते न पाळल्यास काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. योग्य ठिकाणी वाहन पार्किंग करणे आणि रस्त्यावर अयोग्य ठिकाणी पार्किंग टाळणे, मोटार वाहन कायद्यांचे पालन करणे, जास्त वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते तसेच दारू पिऊन वाहन चालवणे धोकादायक असते आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात, हे नागरिकांना समजावून सांगितले.
या जनजागृती मोहिमेत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनीही या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, ही जनजागृती मोहीम नांदेड शहर वाहतूक शाखा आणि एम.जी.एम. कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांसोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा या मोहिमेत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.