
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सत्कार
केरोजी दासरे, निलेश कांबळे ऑफिसर ऑफ द मंथ तर साहेबराव ढगे एम्पलोयी ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित
नांदेड़ – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा रविवारी 26 जानेवारी रोजी नांदेड महानगरपालिकेतही उत्साहात संपन्न झाला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते महापालिकेच्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना Officer of the month व Employee of the month पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनपाचे माजी पदाधिकारी व सदस्य, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त सुप्रिया टवलारे, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादिक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गत वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार अग्निशमन अधिकारी केरोजी सिताराम दासरे व निलेश निवृत्ती कांबळे यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच Employee of the month साठी वसुली पर्यवेक्षक साहेबराव बळीराम ढगे यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नांदेड महापालिका हद्दीत विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या, त्या घटनांमधून नागरिकांचे प्राण वाचवताना आपल्या जीवाची बाजी लावून अग्निशमन अधिकारी दासरे व कांबळे यांनी विशेष कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना Officer of the month म्हणून घोषित करून त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करण्यात आला.
यासोबतच महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्र. १ तरोडा-सांगवीमध्ये कार्यरत असलेले वसुली पर्यवेक्षक साहेबराव ढगे यांनी माहे डिसेंबर २०२४ मध्ये 14 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८०० मालमत्ता धारकांकडून १ कोटी ९० हजार रुपयांचा कर वसूल केला. साहेबराव ढगे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना Employee of the month म्हणून घोषित करून त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ त्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.
कार्यालयीन कामकाज करताना अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम रहावा, त्यांनी केलेल्या कामाचा आनंद आणि समाधान मिळण्याबरोबरच त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्याची घोषणा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केली होती. त्यानुसार 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात महापालिकेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पुरस्कारांची घोषणा होऊनही या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचाही आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये सप्टेंबर २०२४ मध्ये स्वच्छता विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Employee of the month हा पुरस्कार स्वच्छता निरीक्षक मोहन बापूराव लांडगे यांना, ऑक्टोबर २०२४ मध्ये मुख्य कार्यालयातील पार्किंग व्यवस्था सुधारण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चौकीदार स.अहमद स.हुसैन यांना आणि माहे नोव्हेंबर २०२४ मध्ये सामान्य प्रशासन विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल लिपीक सौ. शुभांगी नागोराव चौधरी यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.