
खा. अशोक चव्हाणांनी घेतली इराण दुतावास अधिकाऱ्यांची भेट
अभियंता योगेश पांचाळ बेपत्ता प्रकरण
मुंबई – हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे अभियंते योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता असल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांची भेट घेतली.
खा. चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी इराणी दुतावासात जाऊन मोहिसनेफार्द यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, गेल्या ५ डिसेंबरपासून योगेश पांचाळ बेपत्ता असून, त्यांचे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी इराणमधील संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहेत. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या पार्श्वभूमिवर इराणच्या मुंबईतील कॉन्सुलेट अधिकाऱ्यांनी इराण सरकार व तेथील तपास यंत्रणांशी समन्वय साधून योगेश पांचाळ यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांना केली.