
नांदेड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता पदी विश्वनाथ स्वामी तर क्षेत्रीय अधिकारी पदी राजेश जाधव, गौतम कवडे यांची नियुक्ती
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता पदी महापालिकेचे उपअभियंता विश्वनाथ मनोहर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी बाबरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. या पदावर आता विश्वनाथ स्वामी यांची प्रभारी कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मंगळवारी काढले. त्यासोबतच अशोकनगरचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुलाह बेग यांची सिडको क्षेत्रिय कार्यालय येथे नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अशोकनगरचे वरिष्ठ लिपिक राजेश जाधव यांची प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. वजिराबाद झोनचे क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांची महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी पदोन्नतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ वजीराबाद-इतवाराचे वरिष्ठ लिपिक गौतम कवडे यांची याच क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचेही आदेश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी काढले आहेत. नवनियुक्त सर्व प्रभारी अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.