
अशोक चव्हाण बाहेर पडले अन मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी
नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत
नांदेड – मुस्लिम समाजाचा काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून वापर केला. काँग्रेसचे तत्कालीन नेते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी वर्षानुवर्षे या समाजाला विधानसभेत किंवा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधीच दिली नाही, अशा प्रकारची नाराजी मुस्लिम समाजात पसरली असतानाच, यावेळी मात्र काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला नांदेड मधून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. काँग्रेसची चौथी यादी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये ८६-उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघातून नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काँग्रेसकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या चौथ्या यादीत राज्यातील एकूण १४ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी तिसऱ्या यादीत काँग्रेसचे १६ उमेदवार होते, त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील ०३ नावे घेण्यात आली होती. यात नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे, मुखेडमधून हणमंत पाटील बेटमोगरेकर तर देगलूरमधून निवृत्तीराव कांबळे आदींचा समावेश आहे. दुसऱ्या २३ उमेदवारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नव्हते, तर काँग्रेसच्या पहिल्या यादीत ४८ उमेदवार जाहीर करण्यात आले. यात नांदेड जिल्ह्यातील ०३ उमेदवार घोषीत करण्यात आले. हदगावमधून माधवराव पाटील जवळगावकर भोकरमधून तिरुपती पाटील कोंडेकर व नायगावमधून मिनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले होते. आपापल्या परीने वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे वाटाघाटीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. उत्तरची जागा ठाकरे गटाला, राष्ट्रवादीला की काँग्रेसला सुटणार, याची उत्सुकता लागली होती. शेवटी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी थेट दिल्ली आणि मुंबईची वारी करून बाजी मारली.